काँग्रेसची नवी खेळी; मोदींना सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी पंतप्रधानपद सोडणार

Foto

नवी दिल्‍ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी काँग्रेसने आता नवा डाव टाकला आहे. ’लोकसभा निकालानंतर त्रिशंकू अवस्था निर्माण झाल्यास आम्ही पंतप्रधानपदही सोडायला तयार आहोत. आघाडी सरकारमध्ये आम्हाला पंतप्रधानपद नाही मिळाले तरी काहीच अडचण नाही,’ असे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांनी म्हटले आहे. रालोआ सरकारला सत्तेपासून दूर ठेवणे हेच आमचं उद्दिष्टं असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. 

जर काँग्रेसच्या बाजूने सर्व मित्र पक्ष उभे राहत असतील तर आम्ही देशाचे नेतृत्व करायला तयार आहोत, हे आम्ही आधीच स्पष्ट केलं आहे. रालोआ सरकारला सत्तेपासून दूर ठेवणं हेच आमचं कायम लक्ष्य राहिले आहे. त्यामुळे आम्हाला बहुमताचा निर्णय मान्य असेल, असेही त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, केंद्रात चांगले यश मिळणार नसल्याचं काँग्रेसला वाटत असल्याचे आझाद यांच्या वक्तव्यातून स्पष्ट होत असून त्यामुळेच काँग्रेस पंतप्रधानपद सोडायला तयार झाल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. जोपर्यंत आम्हाला पंतप्रधानपदाची ऑफर दिली जात नाही, तोपर्यंत आम्ही त्यावर काहीच बोलणार नाही, असेही आझाद यांनी स्पष्ट केले. लोकसभा निवडणूक जिंकण्याचा विरोधकांना विश्वास वाटत असेल तर त्यांनी त्यांचा पंतप्रधानपदाचा उमेदवार घोषित करावा, असे आव्हान केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी काँग्रेसला दिले होते.